मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीच्या (ED) पथकाने ताब्यात घेतला आहे. साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भीती आणि धमक्यांमुळे लोक तिकडे जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचा हा पुढचा टप्पा आहे. त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे जेणेकरून हिंदू आणि मराठींना वाचवणारा पक्ष शिल्लक नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी आधीच व्यक्त केली होती. हे निर्लज्ज षडयंत्र असून गळचेपी सुरु आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना शत्रू मानू नका, असे सरन्यायाधीशांचे म्हणणे आहे. परंतु, नवीन पर्व सुरू झाले आहे. लोकशाहीची अशीच हत्या होणार का? अशाप्रकारे ते एकेकाळी त्यांचे सहकारी असलेल्या लोकांची गळचेपी करत आहेत. संजय राऊत यांच्यावर ईडी जी काही कारवाई करत आहे, त्याचे हे उदाहरण आहे. हिंदू आणि मराठी आणि शिवसेनेसाठी आवाज उठवणाऱ्यांची त्यांना गळचेपी करायची आहे, अशीही टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतलं आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ठिय्या आंदोलन करत आहेत.