मुंबई : कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री व त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत आहे, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या गटाचे चाळीस आमदारही होते व ते सर्व नवस फेडण्यासाठी आसामला गेले. नवस फेडण्यासाठी या सर्व लोकांनी प्राण्यांचे बळी दिले व त्याचे समर्थन महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य करतात हे राज्याच्या परंपरेला साजेसे नाही. ईश्वरावर श्रद्धा हवीच, पण त्या श्रद्धेचे अवडंबर किती माजवायचे व सत्ता कायम राहावी म्हणून ईश्वरास ‘बळी’ चढवून लाच का द्यावी? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला. तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत. राज्यपालांचे काय करायचे? याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय? मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत. फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर मुख्यमंत्री ची खरी कसोटी लागणार आहे. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही. चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मंत्रालयात पैशांच्या मोठय़ा उलाढाली सुरू आहेत. त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, असे भाजपवालेच सांगतात. कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाहीत, हेच खरे, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांचे मान खाली घालून भाषण वाचन सुरू झाले की अगदी नको वाटते, असे लोक सांगतात. पुन्हा त्यांचे खासदार चिरंजीव हेच त्यांच्यासोबत कायम असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार या मंडळींना नाही. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाणे महानगरपालिकेत नेमके काय व्यवहार झाले व मलई कोठे गेली व ती किती हजार कोटींची होती? याचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच हे सर्व आदेश दिले जातात. हे खरे मानले तर फडणवीस हे सर्व ओझे कसे पेलणार? हा प्रश्नच आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना सोडली असे शिंदे व त्यांचे लोक सांगत होते, पण शिवरायांचा अपमान होऊनही यांचे हिंदुत्व अजगराप्रमाणे झोपून राहिले व हिंदुत्वाचे ढोंग उघडे पडले. आधी राज्यपाल कोश्यारी, नंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व आता महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा. रोज अपमानास्पद वक्तव्ये सुरू आहेत. लोढा यांनी तर शिंदे यांच्या ‘पलायना’ची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. नवा इतिहास लिहिला जात आहे. सरकार दाढीवर हात फिरवत मजा घेत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय शिंदे यांनी काढला, पण कर्नाटकचे लोक सांगलीत घुसले तरी यांच्या स्वाभिमानाने हालचाल केली नाही! कारण सगळेच जण दांडगाई व खुषामतखोरीत मग्न आहेत. पूर्वीचा साधेपणा गेला. आज त्याच ‘बाजीरावी’चे नवे रूप महाराष्ट्रात दिसू लागले आहे, असा निशाणा संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर साधला आहे.