महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात अभूतपूर्व राजकीय घडामोडी सुरू आहेत. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सूचक ट्वीट केलं आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray News) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray News) असून दोघंही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा फोटो फारच बोलका आहे.
या ट्वीटनंतर देशपांडे यांनी माध्यमांशी संवादही साधला,"बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांचे जो पुढे घेऊन जाईल, त्यालाच जनता आता मान्य करेल. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहेत. राज्यातील जनतेची ही भावना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार हे कोणाचीही प्रॉपर्टी नाही. व्यक्तीवर मालकी हक्क असू शकत नाही.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फक्त प्रकाश आंबेडकर यांचाच हक्क आहे का?"
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे म्हणतात, " काँग्रेस सोबत तुम्ही गेलात, हा बाळासाहेबांचा विचार आहे का?बाळासाहेब हे सगळ्या महाराष्ट्राचे आहेत. कोणाचा काय लोचा आहे हे, हे सगळं राज्य बघतंय. शिवसेना फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. मराठी पाट्या, मशिदीवरील भोंगे हे बाळासाहेबांचे विचार होते ते आता राज ठाकरे पुढे नेत आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय स्पर्धा लपून राहिलेली नाही. त्यात मनसे आणि शिवसेना यांच्यातीलही चढाओढ महाराष्ट्रानं वेगवेगळ्या निवडणुकांमधून पाहिलेली आहे. एकमेकांवर राजकीय भूमिकांवरुन टीका करणं असेल किंवा एकमेकांविरोधातली राजकीय लढाई असेल, मनसे आणि शिवसेना असा संघर्ष कायमच पाहायला मिळाला आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटने आता चर्चांना उधाण आलं आहे.