कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. यावर आता छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपल्याकडे मोठा इतिहास आहे. तरीही तुम्ही विकृत काहीतरी बोलून वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच. तसेच, ते धर्माचेही रक्षक होते हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून ते धर्मवीर आहेत.
अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही बाबत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचे असून, अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहिल की इतिहासाबाबत करण्यात येणारी विधाने बरोबर नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. तरीही तुम्ही विकृत काहीतरी बोलून वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, असा निशाणाही संभाजीराजेंनी साधला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.