ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, शिवतीर्थावर जे घडले, ते दुर्दैवी असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. मराठी माणसांत फूट पाडून, संघर्ष घडवून दिल्लीचा सुल्तान मजा पाहत आहे, हे दुर्दैवच आहे. पण हा संघर्ष अटळही आहे. 17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने शिवतीर्थावर जात, धर्म, राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन लोक स्मृतीस्थळी येतात. तेथे कुणी कुणाला अडविण्याचा प्रश्नच येत नाही, पण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करणारयांनी तेथे यावे व श्रद्धेचा बाजार मांडावा हे योग्य नाही. आज जो मिंधे गट सत्तेत आहे त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि इमानही विकले व पुन्हा 'आम्हीच शिवसैनिक' असे बोंबलत ते स्मृतीस्थळावर पोहोचले. हे ढोंग नाही तर काय?
शिवसेनेची एक जुनी शाखा कमळाबाईच्या मिध्यांनी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केली. तेथे उद्धव ठाकरे पोहोचले व त्यांच्या पाठोपाठ हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंब्यातले हे चित्र कमळाबाईच्या मिध्यांची झोप उडविणारे ठरले. त्याच निद्रिस्त अवस्थेत हे लोक शिवतीर्थावर पोहोचले व स्वतःची शोभा करून परतले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर कमळाबाई पुरस्कृत काही लोक, बाळासाहेब हे आमचेही 'बाप' असल्याचे तावातावाने बोलत होते. ते ऐकून लोकांचे हसून पोट दुखले.
मिंधे गटास एक तर बाप नसावा व असलाच तर तो गुजरात किंवा दिल्लीत असावा. कारण ज्या बेफाम पद्धतीने ते लोक महाराष्ट्रविरोधी कारस्थानांत सहभागी होत आहेत ते पाहता यांचा बाप शिवरायांच्या मातीत व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असूच शकत नाही. मोदी-शहा महामंडळाचे अंतिम ध्येय मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा नायनाट करणे व त्यासाठी शिवसेनेवर घाव घालणे हेच आहे. त्या कारस्थानात सध्याचा 'मिंधे' गट पूर्णपणे सहभागी असल्याने, असल्या महाराष्ट्रद्रोहयांना मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. काही झाले तरी 'बाळासाहेब' त्यांना पावणार नाहीत.
बाळासाहेबांनी ढोंगाचा व सोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. त्यामुळे अशा ढोंग्यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ अपवित्र करू नये ही जनभावना असेल तर ती चुकीची नाही. मिथे गट स्वतःला शिवसेना' मानतो. हा गट उद्या स्वतला अमेरिकेतील रिपब्लिकन, डेमोक्रॅट किंवा इंग्लडमधील हुजूर किंवा मजूर पक्षही समजू शकतो. तो त्यांचा प्रश्न. चार आण्याची भांग प्यायले किंवा रुपयाचा गांजा चिलमीत भरून मारला की अशा कल्पना सुचतात. इथे तर खोकेच खोके असल्याने उच्च प्रतीचे नशापाणी करून कल्पना सुचत असतील. मुळात शिवसेना कोणाची? हा फैसला मोदी-शहांचा निवडणूक आयोग करणार नाही. हा फैसला जनतेच्या न्यायालयात होईल. पण जनतेच्या न्यायालयात जाण्याची हिंमत यांच्यात नाही. दुसरे असे की, शिवसेनेतील फुटीर गटाविरोधात लोकमत बिथरले आहे.