ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह आहे, मग मणिपुरातील हिंसाचारामागचे सत्यशोधन करण्यासाठी भाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपाचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत. पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजपा छाती पिटून घेत आहे.पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो, हे पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले.
तसेच भाजपा पश्चिम बंगालात मागचा आकडा गाठू शकणार नाही व २०२४ साली ते २०० पार तरी होतील काय? हाच प्रश्न आहे. दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून दोन निवडणुका जिंकल्या हे खरेच, पण आता ते शक्य नाही. ग्रामपंचायतींच्या ३५ हजार जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकल्या. भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने ९७२२ ग्रामपंचायती जिंकल्या. तथापि, एकाही जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले नाही. . लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. पश्चिम बंगालात ते दिसले. ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या. असे सामनातून म्हटले आहे.