पुणे : कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी? आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मुख्यमंत्री कसबा विधानसभेत फिरत होते? यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही? त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी म्हंटले आहे.
मी उपोषण केले हे लोकशाही मार्गाने केले. कितीही गुन्हे दाखल केले तरी मागे हटणार नाही. मी कार्यकर्ता आहे मला विजयाचा विश्वास आहे. मी 15 ते 20 हजारांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. मात्र, मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडले तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 मतदान पार पडले. आता 2 मार्चला या मतदानाचा निकाल जाहीर होईल.