मुंबई : रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सोमवारी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर शिवसेनेकडून त्यांची हकलपट्टी केल्याचे पत्रक काढण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या रामदास कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) शरसंधान साधले आहे.
काल सकाळीच मी राजीनामा पत्र दिलं आहे. मग हकालपट्टीचा प्रश्न येतो कुठे, आमदारांची, खासदारांची हकलपट्टी केली. अजून किती जणांची हकालपट्टी करणार आहे? मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?, असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला आहे. उलट विचार करा. ५२ वर्षे काम करणारा कार्यकर्ता राजीनामा देतोय. एकदा कारण विचारायला हवे होते. ही वेळ का येतेय त्याचा अभ्यास कोण करणार, आत्मपरीक्षण कोण करणार, असे सवालच त्यांनी उध्दव ठाकरेंना विचारले आहेत.
राष्ट्रवादीची साथ सोडा असं अनेकदा सांगितलं. मुख्यमंत्री आमचा असतानाही आम्हाला निधी मिळत नव्हता. अजित पवारांकडून फक्त त्यांच्याच आमदारांना निधी दिला जात होता. प्रशासकीय अनुभवामुळे अजित पवारांनी डाव साधला, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.
अजित पवारांनी अडीच वर्षात सेनेची वाट लावली. शिंदेंनी वेळीच पाऊल उचललं नसतं तर शिवसेना पूर्ण संपली असती. शिंदेंच्या भूमिकेचं मी स्वागत करतो, असे म्हणत कदमांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे.
शरद पवार, अजित पवारांनी सेना संपवली. शरद पवार यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं, असा थेट आरोप रामदास कदमांनी केला आहे. यामुळे जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार तिथे दौरे करणार असल्याचा निर्धार कदमांनी केला आहे.
पक्षात फूट पडली तरी राष्ट्रवादी जवळची वाटते, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हिंदुत्वासाठी संघर्ष केला. बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं नसतं, अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.
यासोबतच, विनायक राऊतांवरही रामदास कदम यांनी घणाघात केला आहे. विनायक राऊतांनी शिवसेना पक्षाबद्दल बोलू नये, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहेय