नंदुरबार : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे.
राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यात रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे मनसे झेंड्याचा रंग सारखा बदलतात. त्यामुळे राज ठाकरे हे लांबच बरे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर, राज ठाकरेंमुळे भाजपाचे नुकसान होणार असल्याचेही आठवलेंनी म्हंटले आहे.
तसेच, प्रकाश आंबेडकरांना जास्ती लांब ठेवून चालणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला १२-१२ च्या फॉर्मुला स्वीकारावा लागणार आहे. मात्र स्वीकारल्यानंतर देखील चारी पक्षांचे आम्ही बारा वाजवणार असल्याचे आठवले यांनी सांगितलं.
राम मंदिराचे उद्घाटन हे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिर तयार होते आहे आणि संविधानानुसारच राम मंदिराचे उद्घाटन होते आहे. मात्र, संजय राऊतांसारखे लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहे. राम मंदिरच्या उद्घाटनासाठी अनेकांना निमंत्रण दिलं आहे आणि काही बाकी राहिले त्यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे, असे म्हणत रामदास आठवलेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देणे हे गरजेचे आहे. मात्र, मराठा समाज हा सुशिक्षित असून मोठ्या प्रमाणावर राजकारणात देखील सक्रिय आहे. परंतु, जे गरीब मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे त्या धर्तीवर आरक्षण देता येईल, असा सल्लादेखील रामदास आठवलेंनी दिला आहे.