मुंबई : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आज ५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी आठवलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत कवितेच्या माध्यमातून तुफान फटकेबाजी केली.
रामदास आढवले म्हणाले की, तुमचा कुठलाही असू द्या पक्ष, तुमच्या सेवेसाठी असतो वैद्यकीय कक्ष. श्रीकांत शिंदे यांचे आरोग्य कामासाठी असते लक्ष, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साऱ्या महाराष्ट्रकडे असते लक्ष. मी इथे आलो आहे महाविकास आघाडीला इंजेक्शन देण्यासाठी, म्हणूनच मी राहणार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र यांच्या पाठी. मी गो कोरोना गोची घोषणा केली होती.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गो महाविकास आघाडी गो घोषणा केली होती. कोरोना जरी गेला तरी महाविकास आघाडी का जात नाही हेच माझ्या मनात होते. उद्धव ठाकरे यांच्या सोबत माझे संबंध बिघडले. नंतर तुमचे बिघडले. एकनाथ शिंदे प्लॅनिंग करण्यात हुशार आहे, असे कौतुकही त्यांनी केले आहे.
ते म्हणता सारखे खोके, त्यांचे बिघडले डोके असे म्हणत आठवले पुढे म्हणाले, ते आमचं राज्य येणार म्हणत आहेत. मग, आम्ही काय गोटया खेळतो, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच, मुंबई महापलिका निवडणूक जिंकायची आहे. त्यांचा झेंडा काढायचा आहे. आणि आपला झेंडा लावायचा आहे, असेही रामदास आठवलेंनी यावेळी म्हंटले आहे.