मुंबई : मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा झाला. यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना संबोधले. प्रत्येक राजकीय पक्षाला त्रास होतो. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दुर होईल. मी उगाच आशा नाही देत मला माहिती आहे. पुढेदेखील याप्रकारचे काम करायचे आहे. राज्यातील सर्व महापलिका जिंकायच्या आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
2014 व 2019 ला पंतप्रधान मोदींची लाट आली. याबद्दल मला काय विचारतात कॉंग्रेसची अवस्था काय झाली. भरतीनंतर ओहोटी या गोष्टी येतात. भाजपनेही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ओहोटी येणार हे नैसर्गिक आहे. ते कोणी थांबवू नाही शकत, असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. राजू पाटील पक्षाची बाजू आज एकटा मांडत आहे. ते शोले मध्ये बोलतोत ना एकही है लेकीन काफी है, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.
गेल्या 17 वर्षांचे सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. पक्ष कशातून गेला. काही जण बोलताता लोक पक्ष सोडून गेले. एक-एकटे गेले. मग आपल्याला प्रश्न विचारतात लोक राजसाहेबांच्या सभेला गर्दी होते. पण मतं का नाही पडत. मग 17 आमदार निवडून आले ते काही सोरटं वर निवडून आले होते. हा एक प्रोपोगंडा आहे. जाणून-बूजून अशाप्रकारचा प्रचार जो केला जातो. एवढी गर्दी जमते मते कुठे जातात आणि आंदोलन अर्धवट सोडतात, असे बोलतात. पण, एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेले, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
पक्ष स्थापन करताना मनात एकच विचार होता की महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचा आहे. असे काही केले पाहिजे की जग येथे येईल. इंदु मिलमध्ये एवढे मोठे ग्रंथालय उभे राहीले पाहिजे की जगातून ज्ञान मिळवण्यासाठी लोक आले पाहिजे. पुतळे उभे करुन हाती काही लागणार नाही. ते काय बोलून गेले याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. हे सध्या राज्यात जे काही सुरु आहेत. ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे. इतके गलिच्छ राजकारण सुरु आहे. एवढ्या खालच्या थरांची भाषा कधी पाहिली नाही. टीव्हीवर ही लोक पाहवत नाही. किती खालच्या थराला जाऊन बोलायचे याची काही मर्यादाच उरलेली नाही. हे दाखवणे जेव्हा बंद होईल तेव्हा महाराष्ट्र सुधारलेला दिसेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाला त्रास होतो. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दुर होईल. मी उगाच आशा नाही देत मला माहिती आहे. पुढेदेखील याप्रकारचे काम करायचे आहे. राज्यातील सर्व महापलिका जिंकायच्या आहेत. या निवडणुका कधी होतील हे माहिती नाही. सारखे मार्च-ऑक्टोबर सलग दहावी नापास झाल्यासारखं वाटत आहे. पण, जेव्हा कधी निवडणुका होऊ दे आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच. कारण जनता या सर्व जणांना विटली आहे. रोज तमाशे सुरु आहेत त्याला जनता विटली आहे. आता आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचे आहे. मी भाषण देईल पण घराघरांत तुम्हाला जायचंय. मी आडवाटेने जाईल पण तुम्हाला प्रत्यक्षात जायचंय, असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.
भोंग्याविरोधात आंदोलन, पाकिस्तानी कलाकार हुसकावले आपण केले. तेव्हा सो कॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष माननारे कुठे होते? काय करत होते चिंतन? पण ते जे काही सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी केले. हिंदुत्व म्हणजे काय असते. तुमचे फक्त जपमाळ. कधी हिंदुत्व दिसत नाही. भोग्यांच्या प्रकरणानंतर अयोध्या दौऱ्याला विरोध कोणी केला हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलेल होते. म्हणून सांगितले आता नको. भोंगा आंदोलनावेळी १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या. आणि पुढे काय झाले. म्हणून आपल्या वाटेला जायचे नाही मुख्यमंत्री पदावरुन जावे लागले, असा निशाणाही त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.