महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानावर दाखल झाले आहेत. राज्यातील आरोग्याच्या प्रश्नावर ही भेट होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी चर्चेसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा ही उपस्थित आहेत.
दरम्यान, या भेटीमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी या घटक पक्षांसहित डाव्या पक्षांनी ही समर्थन दिलं आहे. परिणामी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत युतीचे उमेदवार असलेल्या मुरजी पटेल यांना मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी आज मुख्यमंत्री राज ठाकरेंना आवाहन करण्याची शक्यता आहे.
भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपची खेळी?
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास पाहता आतापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी मृत झाल्यास मनसे त्या मतदार संघात तटस्थ राहण्याची भुमिका घेते. मात्र, आता अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये शिंदेगट अर्थात बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून उमेदवार देण्यात आला नाही मात्र, भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा त्यांनी दर्शवला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्यात असलेल्या चांगल्या संबंधांचा विचार करता मुख्यमंत्र्यांना हाताशी धरुन मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.