मुंबई : ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा शनिवारी बीडमध्ये पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला. या टीकेचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. संजय राजाराम राऊत किती शुद्धीत होता. कोणत्या ब्रँडची मारून भाषण देत होता याचा तपास करायला हवा. सभेअगोदर त्यांची ड्रिंकिंग टेस्ट घेतली तर कळेल की दोन 90 मारल्याशिवाय भाषण करत नाही. जे शुद्धीत भाषण करू शकत नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
बीड येथे महाप्रबोधन यात्रेत उद्धव ठाकरे सोबत किती लोक होते? काल बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा झाली. ही यात्रा उद्धव ठाकरे यांच्या सेनेची होती की राष्ट्रवादी काँग्रेसची होती हे सांगा. 5 ची वेळ होती सभा 8 वाजता सुरू झाली. बाईक रॅलीमध्ये ठाकरेंचे किती कार्यकर्ते होते? सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.आधी खुर्च्या रिकाम्या होत्या. मग, राष्ट्रवादी नेत्यांना फोन करून विनवण्या करण्यात आल्या की सभा भरा. स्वतः ला जागतिक नेते समजणारे तुम्ही तुमच्या सभेला गर्दी होत नाही आणि तुम्ही पंतप्रधान, शाह यांच्यावर टीका करता, असे टीकास्त्र नितेश राणे यांनी संजय राऊतांव सोडले आहे.
दोन-तीन दिवसांपासून अमेरिका, ब्रिटनमध्ये पंतप्रधानांना किती मान आहे बघा. तुझ्या मालकाला कलानगरमध्ये कोणी ओळखत नाही. फुकट्या सारखं परफ्यूम सुध्दा तो स्वतः च्या पैशांनी वापरत नाही. कर्जत मधलं फार्महाऊस खोदलं तर तिथे 2000 च्या नोटा सापडतील. त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये नेमकं काय आहे? त्या फार्म हाऊस खाली किती 2000 नोटा आहेत? 2 दिवसांपासून मातोश्रीवर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी किती लोक येतायत याची माहिती राऊतने घ्यावी, असा निशाणाही राणेंनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.
आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा कर्जत फार्म हाउसवरची 2000 ची झाडं मोज आणि मग टीका कर. कर्जत फार्म हाउस सरकारने चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. जमिनीखाली काय आहे ते बघावं लागेल. मी तशी मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितलं आहे.
तुझ्या मालकाने नंदकिशोर चतुर्वेदींकडे किती पैसा ठेवलंय त्याचा हिशोब द्यावा लागेल. ज्यादिवशी नंदकिशोर भारतात येईल आणि सत्य सांगेल तेव्हा कळेल की काळा पैशाचा सगळ्यात मोठा दलाल हा कलानगरमध्ये बसलाय. पत्राचाळीत लोकांना रडवणारे तुम्हीच होता. सामनामध्ये जाहिरातच्या नावाने भ्रष्ट्राचार केला. आता तिकिटचा रेट निघालाय. युवासेना तिकिटांचा रेट 2 कोटी आहे. आम्ही त्या माणसाला समोर आणू शकतो. उद्धव ठाकरेंची प्रथा त्याचा मुलगा चालवतोय, असेही नितेश राणेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे असते तर आज युती तुटली नसती, असे विधान संजय राऊतांनी महाप्रबोधन यात्रेत केले होते. यावरही नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. गोपीनाथ मुंडे असताना सत्ता कोणामुळे गेली? तेव्हा उद्धव जींना मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून सत्ता गेली. हे खरं आहे की नाही हे संजय राऊतने सांगावं, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, पोपट मेलेला आहे. आमचं सरकार टिकला आहे. 2024 पर्यंत आणि त्यानंतर ही आमचाच सरकार असेल. पोपट मेला नसता तर आम्ही आज सत्तेत नसतो. हे साधं सरळ सोप आहे.