महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. वातावरण एकदमच तापलेले दिसत आहे. त्यातच बेळगावात उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर आता त्यांना बेळगावात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. धैर्यशील माने या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. यामुळे बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज हा आदेश बजावला.
महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारीही सुरु आहे. गेल्या आठवड्यात सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील व शंभूराज देसाई यांना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचं कारण देऊन बंदी घालण्यात आलेली होती आणि यानंतर पुन्हा एकदा मानेंना बंदी घातल्यामुळे उद्या बेळगावमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र, यादरम्यान खासदार धैर्यशील माने हे गनिमी काव्याने महामेळावाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.