अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. यावरच आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत केंद्र आणि राज्यसरकारचे आभार मानले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामंतराला मंजुरी दिल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विटरवरून केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. ट्विटमध्ये ते म्हणाले की, औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार. परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य ! अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.