नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहेत. मनीष सिसोदिया यांना जामीन अर्जावरील सुनावणीच्या एक दिवस आधी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने गुरुवारी त्यांना अटक केली.
माहितीनुसार, तिहार तुरुंगात बंद असलेल्या सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. सिसोदिया यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी न्यायालयाने ईडीला तीन दिवसांची मुदत दिली होती. ईडीने 22 ऑगस्ट 2022 रोजी मद्य घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडी सिसोदिया यांची दोन दिवस चौकशी करत होते. ईडीने 7 मार्च रोजी पहिल्यांदा सिसोदिया यांची सुमारे 6 तास चौकशी केली. यानंतर ९ मार्च रोजी २ तास प्रश्नोत्तरे झाली. यावेळी सिसोदिया यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ६ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने सिसोदियाला अटक केली.
दुसरीकडे, ईडीच्या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सीबीआयने मनीष सिसोदिया यांनी आधी अटक केली होती. सीबीआयला कोणताही पुरावा सापडला नाही, छाप्यात पैसे सापडले नाहीत. उद्या जामिनावर सुनावणी होणार आहे. उद्या त्यांना सोडण्यात आले असते. त्यामुळे आज ईडीने त्यांना अटक केली. मनीष सिसोदिया यांना कोणत्याही परिस्थितीत आत ठेवणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. रोज नवनवीन खोट्या केसेस तयार करत आहेत. जनता पाहत आहे. जनताच उत्तर देईल, अशी टीका केजरीवालांनी केली.
दरम्यान, मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. त्यानंतर ते ७ दिवस सीबीआय कोठडीत होते. त्यानंतर ६ मार्च रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांना तिहार तुरुंगात हलवण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता हिनेही दिल्ली दारू धोरणातील कथित घोटाळ्यात नाव समोर आले आहे.