मुंबई : भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्यांवरुन राजकारण चांगलेच तापले असून याविरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु, महामोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याचे वृत्त समजत होते. तर, मोर्चा काढणारच, असा निर्धार महाविकास आघाडीने केला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा. त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना परवानगी दिलेली आहे. कुठलीही अडचण नाहीय. कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा उल्लेख चुकीचा केल्याने भाजप आता आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांविरोधात काळे झेंडे घेऊन माफी मागो आंदोलन करणार आहेत. याबाबत बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्याबाबत आमचा उद्या मोर्चा आहे, म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोकण महामार्गाबाबत भेट घेतली असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनापुर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अद्यापही प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे उत्तर दिले आहे.