शुभम कोळी | ठाणे : भाजप नेते किरीट सोमैय्या सध्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. अशातच, त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु, नेपच्यून डेव्हलपर्सच्या रामराज्य, स्वराज या कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत किरीट सोमैय्या यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नेपच्यून डेव्हलपर्सच्या रामराज्य, स्वराज या कल्याणजवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला. या गैरव्यवहारात भागीदार बांधकाम व्यावसायिकांसोबत काही बँकाही सहभागी असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला.
या प्रकल्पात घर घेणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय ग्राहकांची प्रचंड मोठी फसवणूक झाली असून घर ताब्यात न येताही अनेक वर्षांपासून त्यांचे बँकांचे हप्ते कापले जात आहेत. या सर्व पीडित घर खरेदीदारांना न्याय मिळावा आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी किरीट सोमैय्यांनी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत काही पीडित ग्राहक सुद्धा उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देतांनाच बँकांचा सहभाग लक्षात घेता दिल्लीत जाऊन अर्थ विभागाचे अधिकारी आणि अर्थ मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचं सोमैय्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडेही याचा पाठपुरावा करणार असून पीडितांना न्याय मिळेपर्यंत याचा पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
दरम्यान, किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला असून राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. तर, सोमैय्यांच्या व्हिडीओची दखल अधिवेशनातही घेण्यात आली असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमैय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असे फडणवीसांनी अधिवेशनात म्हंटले होते.