जळगाव : सुषमा अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवी-देवता तसे साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अंधारेंविरोधात आक्रमक झाला आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. ताई कशी काय बोलते ग देवांवर.. थोडी लाज शरम ठेवा, अशा शब्दात त्यांनी अंधारेंना टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना नेत्यांना दादा, भाऊची उपमा देत होत्या. याच स्टाईलने गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ताई कशी काय बोलते ग देवांवर.. थोडी लाज शरम ठेव. अंधारे यांना मी म्हणालेला नटी शब्द हा वाईट नव्हता, माझ्या मनात पाप नव्हतं मी भावनेच्या आहारी बोललो होतो, असं देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. यावरुनही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यातही असंच सुरू राहणार असून विठ्ठल, रुक्मिणी, देवधर्म, हिंदुत्व, साधुसंत व छत्रपतींवर टीका करणारे किती चांगले वक्ते त्यांच्याकडे असल्याचा टोला लगावत त्यांच्याकडे लोक कसे राहतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापुरुषांवर देवधर्मावर व साधुसंतांवर टीका करत आहेत हे पाप भरावा लागेल, अशीही टीका त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, सुषमा अंधारेंनी केलेल्या काही विधानांमुळे वारकरी संप्रदाय आक्रमक झाला होता. या वक्तव्यांचा निषेध म्हणून आळंदीत प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली. यानंतर सुषमा अंधारेंनी माफी मागितली होती. परंतु, त्यांना होणारा विरोध कायम असून त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये मोर्चाही काढण्यात आला. देहू पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.