Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ कायदे पंडितांची फौज उभी केली आहे. त्याचं नेतृत्व ज्येष्ठ वकील हरीश साळवे (Harish Salve) करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. (Eknath Shinde's tweet created a stir in politics)
एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनी दोन ट्विट केली आहेत. आपल्या ट्विटमधून त्यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांनी आघाडी सरकारवर नकार दर्शवला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करू नये हेच त्यांचं म्हणणं होते. असं वारंवार नेते सांगत आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. अशा शब्दात त्यांनी नेते नवाब मलिक यांचे नाव न घेता टीका केल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे तसेच मी शिवसैनिक असा हॅशटॅगही वापरला आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू... अशा शब्दात आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे मत व्यक्त केले आहे.