मुंबई : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावरुन विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडल्याची सातत्याने टीका करत आहेत. या टीकेला आज पहिल्यादांच फडणवीसांनी उत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल, तेव्हा कुटनिती लक्षात ठेवावी लागेल, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी महाभारताचा दाखला देत दिले आहे.
आज आपण जे करतोय. त्याबाबत तुमच्या मनात शंका असू देऊ नका. हा धर्म आहे, अधर्म नाही. कर्णाचे कवचकुंडले काढून घेतल्याशिवाय त्यांचा पराभव शक्य नव्हते. भीष्माला पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरवले. दुर्योधनाला लज्जा झाकण्यासाठी कपडे घातले. सूर्यास्त भासवण्यासाठी चक्र फेकले. अश्वथामा गेला, हे सांगायला सांगितले. हे महाभारताने सांगितले आहे. हा अधर्म नाही, कुटनिती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल, तेव्हा कुटनिती लक्षात ठेवावी लागेल, असा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
लोक म्हणतात दोन पक्ष फोडले, घर फोडले. मला म्हणायचे आहे सुरुवात कोणी केली? जनादेशाचा अपमान कोणी केला? अजित पवार व एकनाथ शिंदे हे छोटे नेते आहेत का? मी मोहिनी टाकली की ते मागे येण्यासाठी ते विचार करून आले आहेत. ज्यावेळी अन्याय होतील तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील. शिंदेंसोबत युती ही नैसर्गिक युती आहे. २५ वर्षांची मैत्री आहे. ही भावनिक मैत्री आहे. अजित पवार यांच्या सोबत ही राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढील १० ते १५ वर्षांत ती पण भावनिक मैत्री होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
मोदींना हरवण्यासाठी देशात सर्व विरोधक एकजूट करत आहेत. आज सगळे लोक मोदींविरोधात एकत्र येत आहे, त्यावेळी हे म्हणून चालणार नाही आम्ही कुणाला सोबत घेणार नाही. सर्वांसाठी आमची दारे खुली आहेत. तुष्टीकरण करणारे पक्ष सोबत घेणार नाही. काँग्रेस सोबत जाणार नाही. एमएमआय सोबत जाणार नाही. तुष्टीकरणामुळे देशाचे विभाजन झाले. त्यामुळे तुष्टीकरण करणारे पक्ष नको, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्र प्रथम ही संकल्पना आहे. महाभारत झाले तर रामायण पण झाले पाहिजे. काल परवा आमचे विद्वान मित्र नाना पटोले म्हणाले, अजित पवार हे बिभीषण आहेत. मला आनंद झाला. ते आपल्याकडे आले तर आपण कोण? (राम) ते ज्यांच्याकडून आलेले ते कोण? (रावण) हे मी बोलत नाहीत. प्राप्त परिस्थितीत उद्धव ठाकरे जे बोलत आहेत, त्यावरून त्यांची मनस्थिती दिसते, अशी निशाणाही फडणवीसांनी साधला आहे.
बिभीषण देखील प्रभू श्री रामचंद्रांकडे आले तेव्हा सेनेने त्यांना का सोबत घेता असे विचारले. तेव्हा श्रीराम म्हणाले, त्यांच्यामुळे रावण मनातून पराभूत होईल. जो नेता मनातून पराभूत होतो, तो कधीच विजयी होत नाही. मी कुणालाही रावण म्हणालो नाही. मी संजय राऊत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.