मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार युतीमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांना वेग आलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री बनणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. परंतु, या चर्चांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे कोणत्याही पक्षातील लोकांना वाटतं. यात काही वावगे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना वाटू शकतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकते की भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणर नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल. १० ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदेंबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. तर, अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे संकेत दिले होते.