मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. दरम्यान, संजय राऊत यांना अखेर ईडीने (ED) अटक केली आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली असून त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येत आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाई बाबत आनंद होत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. पण, ही आमची भूमिका नाही. काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि कारवाई झाली, याचा कोणताही सबंध नाही. राऊतांवर होणारी कारवाई ही पुराव्यांवर अवलंबून आहे. यात आमचा संबंध लावणे चुकीचे आहे.
मुंबई पोलीस कायदा-सुव्यवस्था राखण्यात सक्षम आहेत. राऊत यांचा या प्रकरणाशी संबंध आहे की नाही त्यापेक्षा सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. झोपडपट्टीवासियांना त्यांचे घर मिळेल. पण, आज आपण बघतो या लोकांना बाहेर काढलं जात आणि त्यांना घर दिले जात नाही. गरीबांना घर मिळत नाही आणि असा विषय असेल तर गरिबांना न्याय मिळायला हवा. संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा नाही, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.
याआधी प्रवीण राऊत, अविनाश भोसले यांच्यावर कारवाई झाली ते कोणत्या पक्षाचे नव्हते ना, असा प्रश्न उपस्थित करुन या कारवाया पक्ष बघून होत नाही, असे केसकरांनी म्हंटले आहे. केवळ राजकीय पक्षावर कारवाई होते असे नाही. संजय राऊत बऱ्याचदा बोलले असतील त्यामुळे शिरसाट यांच्याकडून न कळत वक्तव्य आले असेल. त्यांची बाजू भक्कम असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यांना अटक झालेली नाही झाली तर त्यांना कोर्टासमोर जावं लागेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, लवकरच आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल यासाठी काल दिल्ली भेट होती. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्व गोष्टी फायनल होतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.