अमोल धर्माधिकारी | पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली असून दोघांनीही प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच, आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला. आता रवींद्र धंगेकर स्वर्गातून महात्मा गांधींना प्रचारासाठी घेऊन येईल, असे चंद्रकांत पाटलांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आता रवींद्र धंगेकर स्वर्गातून महात्मा गांधींना प्रचारासाठी घेऊन येईल. कोण महात्मा गांधी? शेवटच्या दोन दिवसात गांधींना घेऊन येतील. तेव्हा तुम्ही सांगितले पाहिजे की, ओ धंगेकर तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आला. पण, आम्हाला ते चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला साडेतीन वर्षात मोफत रेशन देत आहेत. लस मोफत दिली त्याची किंमत किती होती? तेव्हा तुमचे गांधी तुमच्याकडेच ठेवा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांवर केली आहे. त्यामुळे चंद्रकात पाटील यांना महात्मा गांधीचे नाव घेऊन रविंद्र धंगेकर पैसे वाटतील अस म्हणायचं आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट आजारी असतानाही प्रचारात सामील केले. गिरीश बापट हे व्हिलचेअरवर केसरी वाडा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन सर्वपक्षीयांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे.