मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावर आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ऋतुजा लटके म्हणाल्या की, मी सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचे प्रत्येकाशी असलेल्या नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहीत रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली होती. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. यानंतर अखेर भाजपने अंधेरी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.