सांगली : कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टीमेटम आज संपला आहे. पण, त्याआधीच म्हैसाळच्या विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९०० कोटी रुपये तात्काळ मंजूर केले आहेत. मात्र, माजी भाजप आमदारानेच शिंदे-फडणवीस सरकारच्या घोषणेतील हवा काढली आहे. सरकारने दिलेले हे आश्वासन हे धादांत खोटे आहे, असा घरचा आहेर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विलासराव जगताप म्हणाले, सह्याद्रीवर काल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच. जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी 200 कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु, विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे, असे टीकास्त्रच त्यांनी शिंदे-फडणवीस गटावर डागले आहे.
दरम्यान, जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुंबची योजनेतून पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. तुंबची योजना तातडीने सुरू करत ते यतनाळ येथील ओडापात्रातून सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर जत येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात विस्तारीत म्हैसाळ योजना युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. परंतु, आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.