मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात वातावरण तापले आहे. अशातच, आणखी एक नव्या वादग्रस्त विधानाची भर त्यात पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान भाजपच्या आमदाराने केले आहे. यावरुन आता विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेसको मैदानात ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले आहे. यावेळी मंचावर भाजपा आमदार आशिष शेलारही उपस्थित होते.
काय म्हणाले प्रसाद लाड?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.
प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाने राजकारण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र, दुसरीकडे भाजप नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी उदयनराजे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल इथे असते तर त्यांना याच टकमक टोकावरून फेकून दिलं असतं, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय. तर, भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. अशातच, प्रसाद लाड यांच्या विधानाने नव्या वादाला फोडणी दिली आहे.