राज्यात मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांने राजकारण एकदम ढवळून निघाले आहे. त्यातच भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर सर्वत्र वातावरण तापले होते. त्यावर त्यांनी विधानाबद्दल माफी मागितली. मात्र, आज हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक त्यांनी भेट म्हणून दिले. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दात काही चूक नाही हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटल यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक दाखवले.
हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे 'माझी जीवनगाथा' हे पुस्तक भेट देण्यात आले. पुस्तकात नमूद केले आहे की एखाद्या कारणासाठी निधी गोळा करणे म्हणजे भीक मागण्यासारखे आहे. असा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. आपल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकात दादांनी आपली बाजू उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका?
पाटील यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. पण फुले दाम्पत्य नसते तर आपण मंत्री झालो नसतो.. एका मंत्र्याने भीक शब्द वापरून बौद्धिक दारिद्र्य दाखवून दिल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.