छ.संभाजीनगर: सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात मोठं खळबळ माजली आहे. वेगवेगळ्या विषयावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्रातील नेते देखील राज्यात वेगवेगळ्या कारणांनी दौरे करत आहेत. त्यातच आता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 16 सप्टेंबर रोजी छ.संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत.
काय आहे शाहांच्या दौऱ्याचे कारण?
मराठवाडा मुक्तिसंग्रामचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्ताने प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय नेते हजेरी लावणार आहेत. दरम्यान याच कार्यक्रमासाठी अमित शाह छ. संभाजीनगरात येणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी अमित शाह छ.संभाजीनगरात दाखल होतील. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.