पुणे : कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याला भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा इतिहास तपासा. ते कसे निवडून येतात हे पण तपासा. निवडणुकीत मुस्लिमांनी 100 टक्के मतदान करावे असे कोण म्हणाले. विरोधकांनी कोणी कुठून पैसे आणले आणि कुठे वाटले हे पण आम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादीने किती आणले, विदर्भातून किती पैसे आले सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाऊ आमचे वकील उत्तर देतील, असे हेमंत रासने यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते रविंद्र धंगेकर?
मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी? आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मुख्यमंत्री कसबा विधानसभेत फिरत होते? यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही? त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचं उपरणं घालून मतदान केंद्रावर गेल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना हेमंत रासनेंनी अनावधानाने तो मफलर माझ्या गळ्यात राहिल्याचे म्हंटले आहे.