नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेची प्रचंड मोठी सभा झाली होती आणि 1995 मध्ये युतीची सत्ता आली. त्यावेळी आपण विरोधक यांच्यासोबत लढत होती, आता स्वकीय यांच्या सोबत लढावं लागतं आहे. या अधिवेशनानंतर राज्यात महविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. यासोबतच भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, काल अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आनंदाची गोष्ट आहे. प्रभू राम आम्हाला शिकविले ते अतिशय नम्र आणि आदर्श होते. आज प्रभू राम आक्राळ-विक्राळ स्वरूपात दाखविले जातात ते आम्हाला शिकविले नाही. बिभिषणाने देखील प्रभू रामाला मदत केली. प्रभू राम यांनी रावणाचा नाश केल्यानंतर ते राज्य बिभिषणाला दिले होते. आताच्या राज्यकर्त्यांसारखे राज्य बळकावले नाही, अशी टीका त्यांनी केली.
आदित्य ठाकरे मला आवडतात, कारण ज्यावेळी या ४० कोल्ह्यांनी गद्दारी केली तेव्हा तुम्ही उभे राहिले म्हणून मला आवडतात. रश्मी ठाकरे यांना पाहून मला मॉंसाहेबांची आठवण झाली, त्या अशाच शांत बसायच्या. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही त्या शांत-संयमी राहिल्या. शस्त्रक्रिया झाली तरी त्या खंबीर राहिल्या. आदर्श माता, आदर्श गृहिणी म्हणून तुमचे नाव आहे. त्यांना माझी विनंती आहे की वहिनींनी बाहेर पडायला पाहिजे. आता बाहेर पडायची वेळ आली आहे कारण विश्वासघात झाला आहे. त्यामुळे आता तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. ज्यांनी विश्वासघात केला. त्यांना या देवभूमीत गाडले पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे.