मुंबई : बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनमुळे दिल्लीतील जेएनयूमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशातच, या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आज मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमधील (TISS) काही विद्यार्थ्यांच्या गटाकडून संध्याकाळी सात वाजता केले जाणार आहे. यावर आशिष शेलार यांनी टीआयएसएसला इशारा दिला आहे. टीआयएसएसने हे धंदे बंद करावेत, असा दमच आशिष शेलार यांनी दिला आहे.
बोगस डॉक्युमेंटरी आहे. अपप्रचार करणाऱ्या या डॉक्युमेंटरीवर भारत सरकारने कारवाई केली आहे. तरीही टीआयएसएसमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न काहींकडून केला जातोय. त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो. आम्ही पोलिसांना आवाहन करतो की कारवाई करा अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ. टीआयएसएसने हे धंदे बंद करावेत, असा दमच आशिष शेलार यांनी दिला आहे.
भाजप नेते अद्वय हिरे यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बरे झाले गद्दार गेले आणि हिरे सापडले, असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरे काही मोठे नेते नाहीत. स्वार्थापोटी गेले त्यांना आमच्या शुभेच्छा, अशी त्यांनी टीका अद्वय हिरेंवर केली आहे.
आदित्य ठाकरे हे उशिरा जागे झाले. चार दिवसांपूर्वी मी हे पत्र लिहिले आहे. मी पत्र लिहून मागणी केल्यामुळे आता त्यांना प्रश्न विचारले जातील म्हणून हे ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. भारतीय जनता पार्टीने हा विषय स्वतः लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना यांना पत्र लिहिले आहे. वराती मागून आदित्य ठाकरे घोडे घेऊन आले आहेत. तुम्ही दिलेल्या परवानग्यांच्या बांधकामामुळे हे सर्व होत आहे, असा आरोप त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
दरम्यान, इंडिया टुडे-सी व्होटरचा सर्व्हे सध्या राज्यात चर्चेत आला आहे. यामध्ये निवडणूका झाल्यास मविआच्या 34 जागा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन विरोधक भाजपवर निशाणा साधत आहे. आशिष शेलार यांनी असेच सर्व्हे उत्तर प्रदेशच्या, गुजरातच्या निवडणुकीपूर्वी काय सांगत होते. सर्व्हेत जगणारे पक्ष आता जागो. आम्ही सेवा करत जगू, असे प्रत्युत्तर दिले आहे.