सूरज दहाट | अमरावती : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) निकालानंतर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याच सरकारला घराचा आहेर दिला आहे. अपक्षाला बदनाम करून चालत नाही. मोठ्या पक्षाचे सुद्धा नियोजन चुकले, असा अप्रत्यक्ष टोला बच्चू कडू यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, अपक्ष आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सपोर्ट करणार होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं ते ठेवले गेलं नाही. अपक्षाला बदनाम करून चालत नाही. मोठ्या पक्षाचे सुद्धा नियोजन चुकले. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय ते अपक्ष आमदार फुटले नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेलच ते शोधले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राज्यसभेच्या तीनही जागा जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. यावर बोलताना बच्चू कडू म्हंटले, त्यात कौतुक करण्यासारखा प्रकार त्याठिकाणी झालेला नाही. पवार साहेब जेव्हा कौतुक करतात. तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने समोर जायचे असेल, असाही अंदाज बच्चू कडू यांनी लावला आहे.