आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. सुनेत्रा पवारांची उमेदवारी चूक असल्याच्या वक्तव्यावरून हल्लाबोल करण्यात आला आहे. गुजराती नेत्यांच्या दबावामुळे निर्णय घेतला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. आता कर्जत-जामखेडसाठीही अजितदादांवर दबाव असल्याचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
रोहित पवार पोस्ट शेअर करत म्हणाले की, आदरणीय दादा,
खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.
#दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, #विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या #कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का #वादा आहे.