महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प निसटून गुजरातला गेल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात जोरदार शाब्दिक रणकंदन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करत असताना भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहे.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला! असं शेलार यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर, पुढे त्यांनी लिहले की, वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे... जनतेसमोर सत्य यायलाच हवे!!'' असे गंभीर आरोप आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केले आहेत.
महाराष्ट्रात येणारा हा सर्वात मोठा प्रकल्प होता. या प्रकल्पाचा खूप फायदा महाराष्ट्राला होणार होता. राज्यातील सुमारे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार होते, पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आशिष शेलारांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद आणखीच चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.