उदय चक्रधर | भंडारा : आप पक्षाचे सिसोदिया हे ज्याप्रमाणे दारू उत्पादकांसाठी विशेष योजना तयार करत होते. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातही मविआ सरकार तळीरामांसाठी सरकार चालवत होते, अशी जोरदार टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर केली होती. या टीकेला उत्तर देताना मात्र ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांची जीभ घसरली आहे. आशिष शेलार घेऊन (दारू) ट्वीट करतात का, असे खळबळजनक विधान सावंतांनी केले आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.
काय होते आशिष शेलार यांचे ट्विट?
ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे. तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात, अशी टीका शेलारांनी केली होती.
अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर
आधी पीएम केअर फंडाची माहिती द्या, अदानी ग्रुप बाबत गप्प का? असा सवाल सावंत यांनी विचारला असून आशिष शेलार यांच्या ट्वीटचा मी निषेध करतो, असे म्हंटले आहे. उध्दव ठाकरे यांची लोकप्रियता बघून त्यांच्या पायाची वाळू सरकत असल्याने हा ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करतांना घेतली होती का, असा खोचक सवालही अरविंद सावंतांनी केला आहे.
दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्यावर कथित दारू घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. परंतु, त्यांच्यावर ह्या झालेल्या कारवाईमुळे दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.