मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले. यावरुन आता राजकारण चांगलेच पेटले आहे. यासंदर्भात अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, सीईओ मिलिंद बोरीकर यांनाही परब यांनी सुनावलं. अडीच तास म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक अनिल परब यांची बैठक झाली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीबाबत माहिती दिली. माझा बांधकामशी संबंध नाही, असे म्हाडाने लिहून दिले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले असून किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मला लेखी उत्तरात स्पष्टपैकी लिहून आलेलं आहे की अनिल परब यांचा बांधकामशी संबंध येत नाही. तसेच, आम्ही स्वतः लिहून दिलं की आम्ही हे बांधकाम तोडत आहोत. हा गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे. या सगळ्या लोकांना मी घेऊन पुढे येणार आहे. मी सोमय्या यांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी त्यांना मोजत नाही मला जी यंत्रणा विचारेल त्यांना मी उत्तर दिलं. एक शिवसैनिक म्हणून मी या लढ्यात उतरलो आहे. हा लढा आक्रमक होणार आहे. ही आग त्यांना खाक करत राहिल. आम्ही त्या अधिकाऱ्यावर देखील दावा ठोकत आहोत. हा लढा संपलेला नाही, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
मी पोलिसांना आवाहन केलं होतं की त्यांना येऊ द्या. पण, ते घाबरट आहेत. गेले कित्येक दिवस त्यांची नौटंकी सुरु आहे. रात्री येणं, ही बायकांची काम झाली. आम्ही मारायला उभे नव्हतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी उभे होतो. महिला त्यांना ओवाळायला उभे होत्या. परंतु, त्यांना नौटंकी करायची सवय आहे. किरीट सोमैय्या यांच्या विरोधात देखील बदनामीचा दावा ठोकला आहे. असे अनेक पुरावे आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांना नाक घासायला लागेल, अशा शब्दात परबांनी सोमय्यांवर निशाणा साधला.
शिवसेना सगळ्यांच्या पाठीशी उभी आहेत. घरांवर हातोडा पडू देणार नाही. जो नियम साई रिसॉर्टला लागणार आहे त्याचं पाप किरीट आणि भाजपच्या माथी लागणार आहे. जे दबावाला बळी पडतात ते पक्ष बदलतात. मी बळी पडणार नाही. मला कायदा कळतो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी घाबरणार नाही, असेही अनिल परब यांनी म्हंटले आहे.