सुरज दाहाट|अमरावती: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद सुरू आहे. हे सर्व होत असताना अनेक महिन्यांपासून शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आता विस्तार झाला नाही त्यावर नाराजी असली तरी मंत्री झाल्यावर काम केलं असतं तसही काम होत. फक्त थोडी नाराजी आहे.' असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोबतच त्यांनी भाजप आणि उद्धव ठाकरेंही टीका केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
शिंदे गटाच्या बंडला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, शिंदे- फडणवीस सरकारने खूप चांगले निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी दाखवून दिलं की मुख्यमंत्री कसे असतात. लोकांना असं वाटतं होत की सत्तेसाठी ही बंडखोरी झाली. अस नाही तर लोकांच्या हितासाठी बंड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी सिध्द करून दाखवलं. असे बच्चू कडू म्हणाले. काही ठिकाणी बीजेपीच्या काही गोष्टी सोडल्या तर सगळं चांगलं झालं. आमच्यावर झालेले आरोप असतील बाकीचे आमदार असतील त्यांनी बदनामी सहन करून सरकार स्थापन केले. त्यांच्यात खुर्चीखाली फटाके फोडण्याचे काम बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून होत असेल तर ते योग्य नाही. अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
पुढे त्यांनी वारंवार होणाऱ्या खोक्यांच्या आरोपांवर देखील भाष्य केले. म्हणाले, आम्ही याविरूध्द जनहित याचिका दाखल करणार आहोत. जे अशाप्रकारे चुकीचे आरोप करतायत. अजित दादांनी जी पहाटेची शपथ घेतली. त्यामध्ये त्यांनी किती खोके घेतले होते. उद्धव ठाकरे पण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसले तेव्हा खोके घेऊन बसले होते का? असं बोलण्यात काही अर्थ नाही पुरावे असतील ते दाखवा पण विनाकारण होणाऱ्या आरोपांमुळे आम्ही कोर्टात जाणार आहोत. असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.