मुंबई : रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली आहे. यात 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 103 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर कदाचित इर्शाळवाडी सारख्या घटना होण्यापूर्वी सरकारने कुठे तरी लक्ष दिला असते, असा निशाणा साधत अमित ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारने लक्ष घालावं याबाबत राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. मात्र, इर्शाळवाडीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून याकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याची टीकाही अमित ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनीही इर्शाळवाडी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय दुःखद आहे. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो, अशी टीकाही राज ठाकरेंनी सरकारवर केली आहे. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असेही त्यांनी म्हंटले आहे