राजकारण

'जागतिक गद्दार दिन'साठी युनोकडे प्रयत्न करा; दानवेंचे कोश्यारींना पत्र

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे माजी राज्यपालांना पत्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहित खोचक सल्ला दिला आहे. २१ जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करावा यासाठी पंतप्रधानांमार्फत युनोकडे मागणी करावी, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरही हल्ला चढविला आहे.

शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. याची दखल जागतिक स्तरावर ३२-३३ देशांनी घेतली असल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले. त्यामुळे जनभावनेचा आदर करत पंतप्रधानांच्या माध्यमातून युनोला पत्र लिहून २१ जून हा दिवस जागितक गद्दार दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असा टोला त्यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपालांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आगळी-वेगळी मागणी केली आहे.

दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्रात असताना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच! ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ - खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याची परिणती २१ जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले.

असे म्हणतात, ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली. जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस जागतिक गद्दार दिन साजरा व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत युनोकडे प्रयत्न करावे, अशी खोचक मागणी दानवे यांनी केली आहे.

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा