पुणे : भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. तर, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा निकाल आहे, असे टीकास्त्र त्यांनी भाजपवर सोडले आहे.
अजून निकाल शंभर टक्के आलेले नाहीत. आजचा निकाल म्हणजे सत्ताधारी पक्षाला चपराक आहे. पदवीधर आणि शिक्षक हा दोन्ही वर्ग आमच्या पाठीशी आहेत. नागपूर सारखी जागा देखील अडचणीत आलेली आहे. कोकणचे उमेदवार जरी जिंकले असतील तरी ते शिवसेनेचेच होते. कोकणचे जिंकलेली उमेदवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते.
सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. पक्षाचा जवळचा कार्यकर्ता होते. पक्षाने उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं. तांब्यांचे अख्ख घराणं काँग्रेसचच आहे. सत्यजित तांबे हे तर पूर्ण काँग्रेसचे त्यांच्या रक्तारक्तात काँग्रेस आहे. सत्यजित तांबेच निवडून येतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाला विचार करायला लावणारा निकाल असून त्यांनी सगळ्यांनी किती मोठा प्रचार केला होता. जे जे करता येईल तेथे त्यांनी केलं तरी सुद्धा निकाल विरोधात येताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा निकाल आहे, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केली.
तर, प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, आमची आघाडी ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. मध्येच मान्यवरांची नावे घेता आणि कारण नसताना काहीतरी विषय काढतात. आमची आघाडी त्यांच्याबरोबर नाहीच त्यांची आघाडी शिवसेनेसोबतच आहे. तसेच, कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन जागा कुठला पक्ष लढवेल हे अजून अंतिम ठरलेलं नाही. लवकरच महाविकास आघाडी उमेदवार जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.