बारामती : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीत जाहीर सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं होते. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु, अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला, असा निशाणा राज ठाकरेंनी साधला होता. यावर आज अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिमिक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क असल्याचा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय काय जमतं? मिमिक्री करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. त्यांनी पाठीमागे बाहेर पडल्यानंतर निवडणुकीत १४ आमदार निवडून आणले. दुसऱ्या टर्मला त्यांचा फक्त एकच आमदार निवडून आला. तो पण आमच्या सहकाऱ्यांनी निवडून आणला. तसेच, त्यांच्याबरोबरची बरेच लोक त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणे आणि अजित पवारांचे व्यंगचित्र काढणे याच्यात समाधान वाटते. याच्यातून ते आनंदी होत असेल तर त्यांना शुभेच्छा, असा मार्मिक टोला अजित पवारांनी राज ठाकरे यांना लगावला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले की, राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. मी निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. समोर शरद पवार होते. तेव्हा लोकं म्हणाले, त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. यावेळी शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं. ते म्हणाले असतील मी जर खरंच राजीनामा दिला तर हे मला पण ये तू गप्प बस तू असे म्हणतील. त्यामुळेच त्यांनी निर्णय मागे घेतला, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली होती.