नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा गदारोळ सुरू असतानाच भारत दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी आज काँग्रेसमध्ये ‘वन मॅन, वन पोस्ट’ला पाठिंबा दिला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दोन पदे मिळू शकत नाहीत, याचे हे द्योतक आहे. यामुळे मुख्यमंत्री पदी सचिन पायलट यांची वर्णी लागू शकते.
कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अशोक गेहलोत उमेदवारी दाखल करणार आहेत. परंतु, केरळमधील वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी यांनी आम्ही उदयपूरमध्ये वचन दिले होते, मला आशा आहे की आम्ही ते वचन पूर्ण करू, असे त्यांनी म्हंटले होते. यामुळे अशोक गेहलोत मुख्यमंत्री पदावर राहून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याची शक्यता आहे. तर, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना गांधी घराण्याची पहिली पसंती असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याची शक्यता आहेत. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतात.
अशोक गेहलोत म्हणाले की, या पदासाठी उमेदवारी करण्यापूर्वी मी शेवटचा प्रयत्न करेन की राहुल गांधी अध्यक्ष होण्यासाठी तयार होतील. परंतु, या पदासाठी आपण स्वत:ला तयार मानत नसल्याचे राहुल गांधी यांनी आधीच नाकारले आहे.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदासाठी सचिन पायलटला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. 2020 मध्ये त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी सचिनला उपमुख्यमंत्री पदावरूनही हटविले होते.