राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे, या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर वेदांता-फॉक्सकॉननंतर 'मेडिसीन डिवाइस पार्क' हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट रिट्विट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी डिसीन डिवाइस पार्क' प्रकल्पासाठी केंद्र सरकारशी केलेले पत्र व्यवहार ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी चतुर्वेदी यांच्या पत्र व्यवहाराचा संदर्भ देत शिंदे सरकरला धारेवर धरले आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट करत म्हटले की, वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे'. 'उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?, असा प्रखर प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.