मुंबई : उध्दव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका शिंदे गट व भाजपकडून सातत्याने केली जाते. याला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून दिले आहे. आमचं हिंदुत्व हे दोन जातींमध्ये भांडण लावणारं नाही, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
आमचं हिंदुत्व हे दोन जातींमध्ये भांडण लावणारं नाही. यांचं हिंदुत्व हे मतांसाठी आहे. आमचे रामराज्याचं हिंदुत्व आहे तर त्यांचे रावणराज्यचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. हिंदुत्वासाठी आम्ही तलवारी घ्यायच्या का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
लोकांना वीज असेल, पायाभूत सुविधा असतील त्यावर लक्ष द्यायला हवं. लोकशाहीसाठी जे महत्त्वाचे आहे ते सरकार असायला हवं. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ती नंतरच्या सरकारने दिली नाही. आम्ही साडेसहा लाख कोटी गुंतवणूक आणली. यांचे उद्योग वेगळे असतात. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. नुकसानभरपाई हातात आलेली नाही पण फोटो लागले आहेत, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.