मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. अव्वाच्या सव्वा पैसा वापरला गेला. चार दिवसांचा खर्च तब्बल 35 ते 40 कोटी एवढा होता. चार्टर विमानाने जाऊनही ते उशिरा पोहचले. त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द झाल्या, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच, मुंबईचा जोशी मठ करायला निघालेले मुख्यमंत्री दावोसमध्ये काय बोलले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमुक-अमुक मोठे नंबर दिले गेले. या ट्रिपचा अभ्यास केला तेव्हा कळालं की महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम होता तो 4 दिवसांचा असायला हवा होता. 4 दिवसांसाठी 40 कोटी खर्च करण्यात आले. 10 कोटी प्रत्येक दिवशी करण्यात आला. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी चार्टर विमानाचा उपयोग केला. जेव्हा चार्टर विमान घेता तेव्हा ते वेळेवर पोहोचायला घेता की उशिरा जायला, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.
16 तारखेला ते सकाळऐवजी संध्याकाळी दावोसला पोहोचले. यामुळे महत्वाच्या बैठका होत्या त्या रद्द झाल्या. एमआयडीसीचे सीईओ गेले होते का? अधिकृत कोण गेलं होतं सगळा खर्च कसा झाला हे सगळ्यांसमोर यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
17 तारखेला दावोसमध्ये शाश्वत विकासावर त्यांनी भाषण केलं. मुंबईचा जोशी मठ करायला निघालेले मुख्यमंत्री काय बोलले असतील, असा निशाणा त्यांनी एकनाथ शिंदेंवर साधला आहे.
देशात कुठेही गुंतवणूक केली तरी राज्याचा विकास महत्वाचा असला पाहिजे. मग नंतर बोलतात की आम्ही कोणाचे माणूस आहोत ते. हे होत असताना कोणासोबत भेटी झाल्या हे समोर आलेलं नाही. ज्या कंपन्यांसोबत एमओयु करण्यात आला त्या कोण? ही धुळफेक आहे, लोकांची फसवणूक आहे. 10 वर्षांची काम फक्त सही करून आलात की काम होत नाही. जे एमओयु साइन केले तेच तिथे जाऊन घोषणा केली. हाथवे कंपनी यासाठी काय काय लिहिलं आहे. स्मार्ट व्हिलेज लिहिलं आहे पण करणार कुठे? जे सेक्टर दाखवले आहेत त्यांचा काहीच ताळमेळ नाही. तुम्ही लोकांना बनवू नका.
जसं रस्ते, वेदांता आहे तसं या बाबत देखील मी आवाहन करतो की दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी केले आहे. मी पुन्हा एकदा घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना आव्हान करतो या आणि जे वेदांताचे डायरेक्टर आहेत त्यांना घेऊन बसू आणि प्रकल्प पुन्हा आणू, असेही त्यांनी म्हंटले आहे.