मुंबई: बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी ठाकूर यांनी जेएनपीटी ते पालघर मेट्रो मार्गिकेकरिता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात यावे, यासाठी विनंती केली.
सर्वसामान्यांचे आयुष्य अधिक सुखकर व्हावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रोजच्या प्रवासाचा वेळ वाचावा, वातानुकूलित अत्याधुनिक मेट्रोतून प्रवास करून जीवनमानाचा दर्जा वाढावा, ह्यासाठी बहुजन विकास आघाडीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सतत वाढत जाणाऱ्या लोकवस्तीचा विचार करता पारंपरिक रेल्वे मार्गावर अवलंबून राहून चालणार नाही. मुंबई मेट्रोप्रमाणे अनेक प्रकल्प कार्यान्वित करून आणि भविष्यातील अनेक प्रस्तावित मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी पावलं टाकणे आवश्यक असल्याचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं.
मेट्रो मार्ग शंभर टक्के विजेवर चालणारा असल्यामुळे पर्यावरणस्नेही आहे. मेट्रोच्या डब्यांत असलेले तंत्रज्ञान अत्याधुनिक असल्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांच्या विजेची बचतसुद्धा होईल याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
मेट्रो रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यावर त्यातून जेवढे अधिक प्रवासी प्रवास करतील तेवढा इंधनावरचा खर्च तर कमी होईलच त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड हवेत कमी प्रमाणात सोडला जाईल असेही ठाकूर यांनी नमुद केले.