मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेला तपासादरम्यान हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली होती. तो कोणत्याही प्रकारे टेम्पर किंवा मॉर्फ केलेला नाही, असे गुन्हे शाखेने म्हटले आहे
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले आणि व्हिडिओ मॉर्फ केलेला नसल्याचे आढळले. हा व्हिडीओ खरा निघाला असताना हा व्हिडीओ कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला, या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत.
दरम्यान, किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. तर, सोमैय्यांच्या व्हिडीओची दखल अधिवेशनातही घेण्यात आली असून विरोधकांनी कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमैय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असे फडणवीसांनी अधिवेशनात म्हंटले होते. सोमय्यांच्या व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.