राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिला अद्याप दिलासा मिळाला नाही. केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज (18 मे) ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.
गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 मे रोजी केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 153, कलम 500, कलम 501, कलम 505, कलम 504 आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.