मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या उमेदवारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिली जाणार होती. परंतु, त्यापुर्वीच उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
एमपीएससीकडून २०१९ साली परिक्षा घेण्यात आली होती. त्यातील उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिली जाणार होती. परंतु, नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणीदरम्यान १११ उमेदवारांच्या नियुक्तीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इब्लूएस प्रवर्गातून नियुक्ती देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याविरोधात विद्यार्थी संताप व्यक्त करत असून आक्रमक झाले आहेत.
मराठा नेते विनोद पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने १११ जणांना नियुक्ती देण्यास नाकारलं नाही. पण, त्यांना ज्या प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आली आहे, त्यावर न्यायालयाचा आक्षेप आहे. आता राज्य सरकारने सुपर मेमरी पद्धतीने उमेदवारांनी नियुक्ती करावी. मागील सरकारमध्येही सुपर मेमरी पद्धतीने उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले आहे.